बीड- अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस आणि मंत्री दादा भुसे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. अखेर सरकारने केलेल्या शिष्टाईमुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे रद्द करून आपले उपोषण मागे घेतले मात्र आंदोलन सुरुच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले. तीन महिन्यात सातारा गॅझेट लागू करा, सरकारने धोका दिला तर नक्कीच मुंबई गाठणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
‘सरकारने हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारित करून द्यावा, ५८ लाख नोंदीला धक्का लागणार नाही याची ग्वाही द्यावी आणि कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटीची अडचण येणार नाही याचाही विश्वास द्यावा. सातारा आणि कोल्हापूर गॅझेट कधी देणार याची हमी द्यावी,’ अशा मागण्या जरांगे यांनी केल्या.‘सरकारकडून नवीन मसुदा आला आहे अशी माहिती मिळते आहे. राज्य सरकारचा मसुदा पाहून त्याबाबत बोलतो. मात्र, जे पाटोद्यात थांबले ते गावाकडे जातील, मला मुंबईला जाण्यापासून अडवल्यावर मी तुम्हाला बोलावून घेतो,’ असे सांगून, जरांगे यांनी त्यांच्या ताफ्यामागे आलेल्या मराठा आंदोलकांना गावाकडे परतण्यास सांगितले.
या ९० दिवसात आपण राज्यभर दौरा करत समाजात जनजागृती निर्माण करणार असल्याचंही जरांगेंनी सांगितलं. याशिवाय हैदराबाद गॅझेटनुसार ५८ लाख नोंदी आढळल्या आहेत. त्यातील एकही नोंद कमी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करू पण आता नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.
