पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीला आयुक्त विजय सूर्यवंशी कार्यालयात उपस्थित असूनही गैरहजर राहिल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत. वेळ देत नाहीत. स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. दालनात उपस्थित असलेल्या आयुक्तांना बोलवा तोपर्यंत बैठक तहकूब करा अशी मागणी नगरसेवकांनी केली.
१४ बोगस उपसूचनांद्वारे ठेकेदारांना दिलेल्या ६० कोटी १८ लाख ६८ हजार रुपयांच्या देयकांचा वाढ-घट करण्याचा अत्यंत वादग्रस्त विषय या बैठकीत मंजुरीसाठी होता. हा संवेदनशील विषय चर्चेत असताना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी सत्यवान उबाळे दोघेही बैठकीला उपस्थित नव्हते. आयुक्त महापालिकेतच आपल्या चौथ्या मजल्यावरील दालनात बसले होते. मात्र त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. अतिरिक्त आयुक्तांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरसेवकांनी चौथ्या मजल्यावर माणूस पाठवून आयुक्त दालनातच असल्याची खात्री केली. आयुक्त वारंवार स्थायी समितीला डावलतात आणि उत्तरे देणे टाळतात, असा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांना तत्काळ बोलावण्याची मागणी केली.
या गोंधळानंतर मुख्य वित्त व लेखा अधिकारी उबाळे यांना तातडीने बैठकीत पाचारण करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत हा विषय मंजूर न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून स्थायी समिती अध्यक्षांनी वेळ मारून नेत बैठकीचे कामकाज पूर्ण केले.
