ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Share

पिंपरी- शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, ग्राहकसंख्या आणि विजेची मागणी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. वीज विषयक प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी महापारेषण आणि महावितरणला कालबद्ध, परिणामकारक आणि भविष्यवेधी नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

महावितरण ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शुक्रवार (दि ३१) रोजी ही बैठक पार पडली. यावेळी मुख्य अभियंता (महापारेषण) अनिल भारसाकळे, अधीक्षक अभियंता (महापारेषण) व्ही. डी. भुजबळ, अधीक्षक अभियंता (महापारेषण) जे. एम. कोकाटे, अधीक्षक अभियंता (सिव्हिल) पी. एच. काकडे , कार्यकारी अभियंता (पिंपरी) एस. एस. मुंडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता (सांगवी) के. एस. गिरी, कार्यकारी अभियंता (भोसरी) व्ही. एस. लहाने, उपविभागीय अधिकारी (हिंजवडी) एस. बी. पाटील, उपविभागीय अधिकारी (खराळवाडी) डी. बी. तरंगे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मतदारसंघनिहाय वीज वितरण सनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समित्यांमार्फत स्थानिक वीजसमस्यांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड राजगुरुनगर, लोणावळासह नवीन परिमंडळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, यामुळे शहराला स्वतंत्र वीज परिमंडळ मिळून प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार आहे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यास मदत होणार आहे.

पुढील सहा महिन्यांत पाषाण–सांगवी वीजवाहिनी, यशदा परिसरात नवीन वीज उपकेंद्र, पिंपरी-चिंचवड शहरासाठी आवश्यक नवीन वीज उपकेंद्रे आणि सबस्टेशनचा सविस्तर प्रकल्प अहवाल, गहुंजे येथील प्रस्तावित २२०/२२ केव्ही, ३०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब उपकेंद्राच्या प्रस्तावाला गती देण्याबाबत चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी कोणती कामे पूर्ण करायची, प्रत्येक कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे कधी पाठविणार आणि मंजुरीपासून निविदा प्रक्रियेपर्यंत किती कालावधी लागणार, याचे निश्चित वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. केवळ प्रस्ताव तयार करून न थांबता दर महिन्याला उद्दिष्ट निश्चित करून प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेण्यावर भर द्या असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत पाषाण–सांगवी वीजवाहिनीचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे सांगवी परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होईल.यशदा परिसरात नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागेच्या प्रस्तावाचा तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नियमित ग्राहक मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.