डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी विविध वैद्यकीय संघटनांचे पिंपरी चिंचवड पोलिसांना निवेदन

पिंपरी- रहाटणी येथे डॉ. संदीप लुनावत आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमधील विविध वैद्यकीय संघटना एकत्र आल्या आहेत. आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन (PCDA), निमा, आयएमए, होमिओपॅथी असोसिएशन, FPA, FDA आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधित आरोपींविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांबाबत वैद्यकीय क्षेत्रात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.
डॉ. संदीप लुनावत हे गेल्या ४० वर्षांपासून रुग्णसेवा आणि समाजकार्य करत आहेत. अशा अनुभवी डॉक्टरांवर क्लिनिकमध्ये हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असून, या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण केली आहे. कोविड महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना आज स्वतःच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही दुर्दैवी परिस्थिती असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी एकजुटीने उभे राहून अशा हिंसक प्रवृत्तींविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. कोणत्याही रुग्णाला किंवा नातेवाइकाला डॉक्टरांविषयी तक्रार असल्यास तिचे निराकरण कायदेशीर मार्गाने आणि निष्पक्ष चौकशीतून झाले पाहिजे. मात्र, मारहाण, धमक्या किंवा दबावाचा वापर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही अशी भावना व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि अशा घटनांमध्ये कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी भूमिका पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनने मांडली आहे.
“आजचा प्रश्न केवळ एका डॉक्टरचा नसून प्रत्येक डॉक्टरच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि संपूर्ण आरोग्यव्यवस्थेच्या भवितव्याचा आहे. आज डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आपण एकत्र उभे राहिलो नाही, तर उद्या अशी घटना कोणासोबतही घडू शकते,” असा संदेश वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांना देण्यात आला.
डॉक्टरांचा सन्मान आणि सुरक्षितता टिकली, तरच आरोग्यसेवा अधिक सक्षमपणे सुरू राहू शकेल. त्यामुळे डॉक्टरांवरील हिंसाचाराला ठाम विरोध करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यासाठी सर्व वैद्यकीय संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.






