पुण्यात २० नोव्हेंबरनंतर रस्ते खोदल्यास चारपट दंड; महापालिका आयुक्तांचा इशारा

पुणे- पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. स्पर्धेच्या मार्गावर विविध सुविधांसाठी सुरू असलेले खोदकाम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या मुदतीनंतर खोदकाम केल्यास सध्याच्या शुल्काच्या किमान चारपट दंड आकारण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. १२) महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त आढावा बैठक झाली. यामध्ये स्पर्धेच्या मार्गावरील पॅकेजमधील पायाभूत सुविधा आणि सुशोभीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. परवानगी मिळूनही विविध यंत्रणांकडून खोदकामाची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुदतीनंतर खोदकाम करणाऱ्या यंत्रणांवर प्रस्तावित धोरणानुसार सध्याच्या शुल्काच्या किमान चारपट दंड आकारला जाणार आहे. संबंधित संस्थांना किती काम पूर्ण करणार, किती कर्मचारी तैनात करणार आणि किती पथके कामावर असणार, याची लेखी माहितीही द्यावी लागणार आहे. रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती वेळेत व योग्य दर्जाने व्हावी यासाठी महापालिका आपल्या नियुक्त कंत्राटदारांमार्फत ही कामे करून घेण्याचाही विचार करत आहे.
एमएनजीएल (MNGL), महावितरण (MSEDCL), दिनेश इंजिनिअरिंग आणि अलाईड डिजिटल यांसारख्या सर्व संबंधित यंत्रणांना त्यांनी नेमलेले मनुष्यबळ, कार्यपथके आणि २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणाऱ्या कामाचे प्रमाण याबाबतचे लेखी हमीपत्र सादर करावे लागणार आहे. खोदाईमुळे खराब झालेले रस्ते आणि पदपथ तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरातील चारही विकास पॅकेजअंतर्गत सुरू असलेले डांबरीकरण, सायकल ट्रॅक आणि सुशोभीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती देण्याचे निर्देश
कामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिले.
पुणे ग्रँड टूरच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पॅकेज १, २, ३ आणि ४ अंतर्गत सर्व कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करावीत. कामांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांचा वेग वाढवावा. तसेच, निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व जबाबदार यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी दिले.
शहरातील विकासकामे करताना मेट्रो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) तसेच इतर संबंधित संस्थांशी योग्य समन्वय साधून कामांचे नियोजन करावे. तसेच, सर्व संबंधित कंपन्यांनी शहरातील सुरू असलेली सर्व प्रकारची खोदाईची कामे दिनांक २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. पुणे ग्रँड टूर २०२७ नंतर खोदाईची कामे करावयाची असल्यास संबंधित कंपन्यांकडून प्रचलित दराच्या चारपट दराने दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त श्री. निखिल मोरे, मा. उपायुक्त श्री. माधव जगताप, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/vI31aw2xUv#PuneGrandTour #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #RoadDevelopment #UrbanDevelopment #DevelopmentWorks #RoadInfrastructure #CivicDevelopment #SmartPune #ProjectMonitoring #InfrastructureProjects #TimelyCompletion #RoadExcavation #InterDepartmentalCoordination #MaharashtraGovernment #PuneCollector #NavalKishorRam #JitendraDudi #PuneUpdate
— PMC Care (@PMCPune) November 13, 2026






