पुण्यातील ‘या’ बस स्थानकाचा कायापालट होण्याचा मार्ग मोकळा ; बनणार महाराष्ट्रातील सर्वात मेगा बसस्थानक

पुण्यातील ‘या’ बस स्थानकाचा कायापालट होण्याचा मार्ग मोकळा ; बनणार महाराष्ट्रातील सर्वात मेगा बसस्थानक
Share

पुणे- आधुनिक सुविधा, प्रशस्त प्रतीक्षागृह आणि एसटी बस, पुणे मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस आणि रिक्षा या वाहतूक सेवांची जोडणी यामुळे पुण्यातील एका बसस्थानकाच्या कायापालट होणार आहे. हे बसस्थानक महाराष्ट्रातील सर्वात मेगा बसस्थानक बनण्यासाठी तब्बल 825 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास करण्यात येणार आहे. हे बसस्थानक आहे पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक.

शिवाजीनगर एसटी बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी झालेल्या बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय टप्पे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. पुढील ३ ते ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्विकासातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचे एकत्रीकरण. नव्या वाहतूक केंद्रातून एसटी बस, पुणे मेट्रो, रेल्वे, पीएमपीएमएल बस आणि रिक्षा यांची जोडणी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे शिवाजीनगर बसस्थानकाचे रूप पूर्णपणे बदलणार आहे. नव्या वाहतूक केंद्रातून दररोज १ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरासह खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो.

या पुनर्विकास प्रकल्पात प्रवाशांच्या सोयीसुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. नव्या बसस्थानकात प्रशस्त प्रतीक्षागृह, बस उभ्या करण्यासाठी मोठी जागा आणि बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र कार्यशाळा उभारण्याची योजना आहे. याशिवाय व्यावसायिक वापरासाठी जागा आणि प्रवाशांना आवश्यक असलेल्या इतर सुविधांचाही समावेश केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. पुणे शहरातील तसेच शहराबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येईल. त्यामुळे प्रवासादरम्यान वाहन बदलताना होणारी धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे.

Vedh News