लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केलेल्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सासवड- हडपसर रस्त्यावरची घटना

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केलेल्या कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सासवड- हडपसर रस्त्यावरची घटना
Share

पुणे- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केलेल्या नव्या कारमधून निघालेले असताना रस्त्यात अंधारात उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.१०) मध्यरात्री घडला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातात संजय वसंत मोडक (वय ४९) आणि अविनाश बाळासाहेब अर्णे (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मोटारचालक सुनील दिगंबर मोडक ( वय ३९) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंटेनरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच खरेदी केलेल्या कारमधून सुनील मोडक हे सासवड- हडपसर सर्व्हिस रस्त्यावरून जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये संजय मोडक आणि अविनाश अर्णे होते. सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या ठिकाणी अंधारात एक कंटेनर उभा करून ठेवला होता. शिवाय या कंटेनरची पार्किंग लाईट देखील चालू नव्हते. त्यामुळे उभा असलेला कंटेनर न दिसल्यामुळे कार थेट कंटेनरला मागून धडकली.

या भीषण अपघातात संजय मोडक आणि अविनाश अर्णे यांचा मृत्यू झाला तर सुनील मोडक जखमी झाले. ऐन दिवाळीत नव्या कारचा अपघात होऊन कुटुंबातील दोघांना जीव गमवावा लागल्याने कुटुंबावर काळाची झडप बसली आहे. सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीसाठी खुल्या असलेल्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने आणि पार्किंग लाईट न लावता कंटेनर उभा केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी कंटेनरचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Vedh News