पुणे महापालिकेचे नवे मुख्यालय शिवाजीनगरमध्ये उभारण्याचा प्रस्ताव, मुख्यालयासाठी कोणती जागा विचाराधीन ?

पुणे- शिवाजीनगर येथील शिवाजी आखाड्याच्या जागेवर मनपाचे स्वतंत्र आणि अत्याधुनिक प्रशासकीय मुख्यालय उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला आहे. त्यासाठी शिवाजीनगरमधील ‘शिवाजी आखाडा’ परिसरातील सुमारे २.५ एकर जागेचा वापर नवीन प्रशासकीय केंद्र उभारण्यासाठी करण्याबाबत विचार केला जात आहे.
पुणे महापालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली. त्यानंतर १९६६ मध्ये सध्याच्या मनपा मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. प्रशासनिक आणि राजकीय कामकाजाचा विस्तार झाल्यानंतर २०१५ मध्ये लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ही इमारत २०१८ मध्ये वापरासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका व अन्य कामकाजासाठी स्वतंत्र व्यवस्था झाली. मात्र मनपाच्या विविध प्रशासकीय विभागांसाठी जागेची समस्या कायम आहे.
शिवाजीनगरमधील ‘शिवाजी आखाडा’ परिसरातील सुमारे २.५ एकर जागा पुणे महानगरपालिकेच्या मालकीची असली, तरी ती दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर (लीजवर) देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आखाड्याचे स्थलांतर, जमिनीचा ताबा, इमारतीचे डिझाइन आणि निधीची उपलब्धता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. शिवाजी आखाडा बालेवाडी परिसरात स्थलांतरित करण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पुढील चार वर्षांत या इमारतीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप अंतिम मंजूर बांधकाम प्रकल्प नसून, आखाड्याचे स्थलांतर, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा, इमारतीचे डिझाईन आणि निधी याबाबत अधिकृत निर्णय होणे बाकी आहे.






