स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महापालिका ठरली अव्वल; राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महापालिका ठरली अव्वल; राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
Share

पिंपरी- स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान मिळविला आहे. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिकेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून, महानगरपालिकेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, संबंधित विभागाचे सचिव सतेंद्र सिंह आणि सचिव डी. थारा यांच्यासह केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. महाराष्ट्रात मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत शहराची कामगिरी उंचावण्यासाठी केवळ महापालिका यंत्रणेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्याऐवजी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात स्वच्छतेची शिस्त रुजविण्यावर महानगरपालिकेने भर दिला आहे. कचऱ्याचे उगमस्थानी विलगीकरण, नियमित संकलन, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि पुनर्वापर या बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. या प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड आणि विविध प्रशासकीय विभागांचा समन्वय मिळाल्याने शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक संघटित आणि परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले. या कामगिरीची दखल राज्यासह राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.


महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या समन्वयातून महापालिका प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छताविषयक योजनांची अंमलबजावणी, क्षेत्रीय स्तरावरील देखरेख, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला आहे.

Vedh News