आता मोबाइलवर बोलत बस चालवल्यास …., पीएमपीएमएल बसचालकावर राहणार ‘डीएमएस’ची करडी नजर
पुणे- पीएमपीएमएल बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून आगामी काळात ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या १००० बसमध्ये अत्याधुनिक ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम बसवली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बसचालकाच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षाची करडी नजर असणार आहे.
अनेक घटनांमध्ये बसचालक गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलताना, सोशल मीडियावर रील्स पाहत असताना किंवा कानात हेडफोन लावून बोलत असताना आढळून आले आहे. या सर्व गैरप्रकारावर नजर ठेवण्यासाठी या प्रकारांना आला घालण्यासाठी ही सिस्टीम काम करणार आहे. चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्टेअरिंगसमोर एक विशेष सेन्सरयुक्त कॅमेरा लावला जाईल. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बसचालकाच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यामध्ये टिपल्या जाणार आहेत.
चालकाची काही चूक किंवा निष्काळजीपणा आढळल्यास, त्याची तात्काळ नोंद होऊन तो अलर्ट पीएमपीएमएलच्या नियंत्रण कक्षाला पाठवला जाईल. त्या माहितीच्या आधारे संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे.
