केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे तळेगाव दाभाडे येथील रविवारचा आठवडे बाजार बंद

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे तळेगाव दाभाडे येथील रविवारचा आठवडे बाजार बंद
Share

तळेगाव दाभाडे- केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या रविवारी (दि. १५) भरणारा तळेगाव दाभाडे येथील साप्ताहिक आठवडे बाजार रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नगरपालिकेला बाजार रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (दि. १५) शहरातील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या नियोजित कंपनी पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या व्हीआयपी दौऱ्याच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली असून, सर्व भाजी विक्रेते, व्यापारी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अमित शाह यांचा असा आहे दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. १६ नोव्हेंबरला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. पुणे जिल्हा परिषद परिसरात हा कार्यक्रम होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाह यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. याशिवाय तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. मुंढवा येथील भारत फोर्जलाही ते भेट देणार आहेत. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी संभाव्य चर्चेमुळे या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Vedh News