पुण्यात दारुच्या नशेत दोघांची पोलीस उपनिरीक्षकाशी झटापट, खराडी परिसरातील घटना

पुण्यात दारुच्या नशेत दोघांची पोलीस उपनिरीक्षकाशी झटापट, खराडी परिसरातील घटना
Share

पुणे- दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या दोन जणांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस उपनिरीक्षकाशी झटापट केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना खराडी परिसरातील टेक्सास टॉवर सोसायटीसमोर गुरुवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अजय जयकुमार सावंत (वय ३५) आणि किसन सीताराम झेंडे (वय ३२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अशोक केदार यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री खराडी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी टेक्सास टॉवर सोसायटीसमोर सावंत आणि झेंडे दोघे दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांना समजावून सांगून तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

यावेळी दोघांनी पोलिसांशी झटापट केली. तसेच या झटापटीत अंमलदार अशोक केदार यांच्या गणवेशाचे बटण तोडून त्यांना जखमी केले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सातपुते पुढील तपास करीत आहेत.

Vedh News