वॅगनर कारमधून यायचा, नंबरप्लेट काढून महामार्गावर वाहनचालकांना लुबाडणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले

वॅगनर कारमधून यायचा, नंबरप्लेट काढून महामार्गावर वाहनचालकांना लुबाडणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले
Share

पुणे- कंटेनरला आपली कार आडवी घालून कारवाईची भीती घालून भरदिवसा वाहनचालकांना लुबाडणाऱ्या पोलीस अमलदाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हा प्रकार पुणे बंगळुरू महामार्गावर वारजे येथील डुक्कर खिंडीत घडला.

बाबुराव पोपट ढोले असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून तो पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर आहे.

याबाबत शिवकुमार बच्चुलाल सरोज (वय २३, रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) या कंटेनर चालकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डुक्कर खिंडीत गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव ढोले हा महामार्गावर गाड्या थांबवुन त्यांच्याकडील कागदपत्रे तपासून लाच मागत असल्याची माहिती पोलिसांना होती. अशाच एका प्रकरणात यापूर्वी त्याला पकडण्यात आले होते. त्यावरुन त्याला गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ४ ते ५ महिन्यांपूर्वी त्याचे निलंबन मागे घेऊन पोलीस मुख्यालयात त्याची नियुक्ती करण्यात आली होती. बाबुराव ढोले हा त्याच्या वॅगनआर कारमधून महामार्गावर येत. कारची मागील नंबरप्लेट काढून ठेवत होता.

या महामार्गावर ब्रेक डाऊन गाड्यांची दुरुस्ती करणार्‍यांना याची कुणकुण लागली होती. नेहमीप्रमाणे बाबुराव ढोले हा पोलीस गणवेशात गुरुवारी सकाळी डुक्करखिंडीत कारने आला. त्याने परराज्यातील कंटेनरला आपली कार आडवी घालून थांबविली. त्याच्याकडे सर्व कागदपत्रे असतानाही त्याने कंटेनर चालकाकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिले तर ‘‘तुने मुझे पैसा नही दिया, तो तेरी गाडी जप्त करुंगा औरे तुझे भी यहा से जाने नही दुंगा’’अशी भीती घालून पैशांची मागणी केली.

बाबुराव ढोले हा कंटेनर चालकाला थांबवुन पैशांची मागणी करीत असल्याचे या ब्रेक डाऊन गाड्यांची दुरुस्ती करणार्‍यांना समजले. त्यांनी पोलिसांना कळविले. त्याचवेळी वारजे माळवाडी पोलीस तेथेच जवळपास होते. ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी बाबुराव ढोले याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. शिवकुमार सरोज यांच्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा तपास करीत आहेत.

Vedh News