निगडीत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पिंपरी -निगडी परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रिया स्टोअर्स दुकानासमोरील डिव्हायडरजवळ घडला.
बाळासाहेब पंढरीनाथ साळवे (वय ४५) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दुचाकीवरून अंकुश बोऱ्हाडे चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
या अपघातात बाळासाहेब साळवे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक पियूष प्रकाशचंद्र मेहता (वय ४१, रा. कात्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय साळवे (वय २३) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.






