पत्नीने पतीच्या हत्येसाठी दिली १५ लाखांची सुपारी, ज्याला सुपारी दिली त्यानेच….

पत्नीने पतीच्या हत्येसाठी दिली १५ लाखांची सुपारी, ज्याला सुपारी दिली त्यानेच….
Share

पुणे- आई वडिलांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. पण लग्नाच्या २० वर्षानंतर पत्नीच त्याच्या जीवावर उठली. त्याच्या इस्टेटीसाठी पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीच्या हत्येची १५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय फिर्यादीने आई-वडिलांचा विरोध पत्करून २००६ मध्ये नात्यातील तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, कालांतराने मालमत्तेच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. दरम्यान, २०२३ मध्ये पतीचा त्याच्या महाविद्यालयीन मैत्रिणीशी पुन्हा संपर्क आला. सततच्या वादाला कंटाळून पती आईकडे राहण्यासाठी गेला होता. त्यानंतर पत्नीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणाला २० सप्टेंबर २०२६ रोजी धक्कादायक वळण मिळाले. फिर्यादीच्या चुलत बहिणीच्या मुलाने त्यांची भेट घेऊन कथित हत्येच्या कटाची माहिती दिली. भाच्याच्या सांगण्यानुसार, मामी, तिची आई आणि मामा यांनी त्याला भेटून फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीची हत्या करण्यासाठी १५ लाख रुपयांची सुपारी देऊ केली होती.

भाच्याने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ पासून त्याला टप्प्याटप्प्याने १२ लाख ५० हजार रुपये देण्यात आले होते. यापूर्वीही काही व्यक्तींना हत्येची सुपारी देण्यात आली होती; मात्र त्यांनी काम पूर्ण केले नसल्याने आपल्याला हे काम देण्यात आल्याचा दावा त्याने केला. विशेष म्हणजे, भाच्याने मामीसोबत झालेल्या कथित संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंगही फिर्यादीला ऐकवले. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर पुढील तपास करत आहेत.

Vedh News