व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या गुंड तुषार हंबीर याला अटक

व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या गुंड तुषार हंबीर याला अटक
Share

पुणे – खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या गुंडाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. 

तुषार नामदेव हंबीर (वय-४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हंबीरवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी त्याच्यासह साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

कापूरहोळ येथे मद्यविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह असलेल्या एका व्यावसायिकाचा मुलगा ३ मार्चला दुपारी दुचाकीवरून उपाहारगृहातून घरी जात असताना कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याला अडवून जबरदस्तीने मोटारीत बसविले. मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच व्यावसायिकाने तत्काळ राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनीही तातडीने तपास सुरू करून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी शिरवळ पर्यंत गाडीचा पाठलाग केला. पोलिसांचे वाहन येत असल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कार रस्त्यावरून शेतात नेली. त्यानंतर तरुणाला रस्त्याच्या कडेला सोडून आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची चौकशी केली असता, आरोपींनी कारमध्ये त्याला धमकावल्याचे समोर आले. त्यापैकी एकाने पिस्तुलाचा धाक दाखविला, तर दुसऱ्याने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Vedh News