पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केली. तर हत्या करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना २८ जुलै रोजी दुपारी युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये, शिंदे गाव (ता. खेड) येथे घडली.
चिरंजीत बसूमातो (वय ३७, रा. जालपैगुरी, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. अमरूष उरानो (वय ४३, जालपैगुरी, पश्चिम बंगाल) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र विलास पवार (वय ४३, रा. भोसरी) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये रविवारी दुपारी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारामारी झाली. रंगाच्या भरात अमरूष उरानो याने लाकडी पाटाने डोक्यात मारहाण करून चिरंजीत बसूमातो याचा खून केला. या मारामारीत अमरूष उरानो देखील गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचाही मृत्यू झाला. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
