पुणे- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीचा आनंद घेत आहेत. पुणेकर पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. फक्त ५०० रुपयांमध्ये पुणेकरांना मुळशी, ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने त्यासाठी एका विशेष बसचे नियोजन केले आहे.
पीएमपीने ९ अ हा नवीन जलद मार्ग सुरु केला आहे. या नवीन विशेष बसचा प्रवास पुणे स्टेशन येथून सुरू होईल. त्यानंतर पुढे स्वारगेट, डेक्कन जिमखाना, मुळशी शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, टाटा मुळशी धरण आणि पळसे धबधबा असा निसर्गरम्य प्रवास करून बस पुन्हा डेक्कन जिमखाना व स्वारगेटमार्गे बस पुणे स्टेशन येथे परत येईल. अवघ्या ५०० रुपयांच्या तिकिटात पर्यटकांना संपूर्ण दिवसभर या निसर्गसफरीचा आनंद घेता येईल.
सध्या पीएमपीएमएलच्या एकूण १३ पर्यटन मार्गांचे संचलन सुरू आहे. या नवीन मार्गासह सर्व पर्यटन बसेसचे ॲडव्हान्स बुकिंग पर्यटकांना शहरातील डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या आठ ठिकाणी करता येईल. पावसाळी निसर्गसौंदर्याचा सुरक्षित आणि सुलभ अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी या स्वस्त बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे.
