ब्रेकिंग न्यूज

विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन, पुणे महापालिकेच्या शाळेतील प्रकार

Share

पुणे- पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून एका महिला नगरसेविकेचे पाय धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सुखासागर नगर येथील महापालिकेच्या शाळेत देखील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भाजपच्या नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांकडून वर्षा साठे यांचे पाद्यपूजन केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. नगरसेवकांचे पाय धुवून कशी गुरूपोर्णिमा करताय असा सवाल विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निषेध केला असून शाळा या शिक्षण, समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची ठिकाणं असून त्या व्यक्तिपूजेचे केंद्र बनू नयेत, असं म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि संविधान असावे, कोणत्याही व्यक्तीची पूजा नव्हे, असे त्यांनी नमूद केले आहे.