देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केटयार्डात दाखल, ४१ हजारांचा विक्रमी दर
पुणे- पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर कोकणातील फळांचा राजा अशी ओळख असलेल्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यात आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केटयार्ड येथे दाखल होत असते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची पहिली पेटी आली असून या देवगड हापूस आंब्याला तब्बल ४१ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड येथील व्यापारी तसंच संचालक बापू भोसले यांच्या गाळ्यावर आंब्याची पहिली पेटी आणण्यात आली होती. विविध व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलावात व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी ५ डझनची पेटी ४१ हजार रुपयांना खरेदी केली. हा आंबा आशिष तळपे या शेतकऱ्याच्या बागेतून आला आहे. यंदा आशिष तळपे यांनी देवगड येथील ४ पेट्या मार्केटयार्ड येथे आणल्या, तर रत्नागिरी येथील तान्हाजी तांबे यांनी एक पेटी आणली होती.
याच वर्षाच्या सुरुवातीलाही आंब्याचा हंगाम बाजारात पाहायला मिळाला होता. म्हणजेच एकाच वर्षात दोन हंगामांतील आंबे मार्केटयार्ड येथे दाखल झाले आहेत. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बाजारात आंब्याची आवक कमी प्रमाणात होणार असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले.
