चिखलीत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह ; घातपाताची शक्यता

चिखलीत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह ; घातपाताची शक्यता
Share

पिंपरी- चिखलीतील चेरी चौक येथे आरंभ हॉटेलजवळ दोन रस्त्यांच्या मधोमध असलेल्या झाडीमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, त्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस सर्व शक्यतांच्या अनुषंगाने तपास करत आहेत.

दरम्यान, या तरुणाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, तपासानंतरच मृत्यूमागील नेमके गूढ उलगडणार आहे.

Vedh News