पुण्यातील सिंहगड संस्थेच्या ६ माध्यमिक अन् ४ प्राथमिक शाळांची मान्यता रद्द ; शिक्षण विभागाची कारवाई

पुण्यातील सिंहगड संस्थेच्या ६ माध्यमिक अन् ४ प्राथमिक शाळांची मान्यता रद्द ; शिक्षण विभागाची कारवाई
Share

पुणे- पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या ६ माध्यमिक आणि ४ प्राथमिक अशा एकूण १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. १८ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत आहे. यामुळे हा निर्णय घेतला आहे.

शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या कारवाईत सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश आहे. नऱ्हे, आंबेगाव, खुसगाव, वारजे, कर्वेनगर आणि कोंढवा येथील शाळांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांचे वेतन थकीत असल्याने वेतन मिळेपर्यंत शिक्षकांनी शिकवण्यावर बहिष्कार टाकला होता.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत झाले होते. शिक्षण विभागाच्या तपासणीतही ही बाब समोर आली होती. या प्रकरणी २० जुलै २०२६ रोजी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांसमोर सुनावणी झाली होती. त्यात संस्थेचे प्रतिनिधी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापली बाजू मांडली होती.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शिक्षकांचा बहिष्कार आणि वेतनप्रश्नी तोडगा न निघणे, या बाबी मान्यता रद्द करण्याच्या निर्णयात महत्त्वाच्या ठरल्या होत्या. शिक्षण विभागाने संस्थेला वारंवार सूचना देऊनही थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे अखेर शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १ मे २०२७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे पुढील शैक्षणिक वर्षांपासून या शाळांमध्ये नव्या प्रवेशाचा मार्ग बंद होणार आहे.

कारवाई झालेल्या शाळा

माध्यमिक शाळा :

१. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नऱ्हे

२. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव

३. सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव

४. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे

५. आर. एम. डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर-एरंडवणे

६. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा

प्राथमिक शाळा

१. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, आंबेगाव

२. सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव

३. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा

४. आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे

Vedh News