कर्जत येथील वृक्षतोडीच्या निषेधार्थ घोडनदीत जलसमाधी आंदोलन ; सह्याद्रीतील विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची मागणी

कर्जत येथील वृक्षतोडीच्या निषेधार्थ घोडनदीत जलसमाधी आंदोलन ; सह्याद्रीतील विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची मागणी 
Share

घोडेगाव – कर्जत भीमाशंकर येथील वृक्षतोड आणि पर्यावरण विनाशकारी प्रकल्पांविरोधात शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ घोडेगाव येथील घोडनदी पात्रात सोमवारी (ता ९) प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

सह्याद्री डोंगररांगांतील विनाशकारी प्रकल्प रद्द करणे, भीमाशंकर परिसरातील टोरंट प्रकल्पासह प्रस्तावित प्रकल्पांना स्थगिती देणे आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे या प्रमुख मागण्यांसाठी ‘शिवभूमी सह्याद्री बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य’च्या वतीने भीमाशंकर येथील महाद्वाराच्या बाजूला विविध पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थ व निसर्गसंरक्षक मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनाला पाली (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.

दहा दिवस लोटूनही शासन किंवा प्रशासनाकडून आंदोलकांची कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. या दरम्यान दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ घोडेगाव येथील घोडनदी पात्रात प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

हा केवळ आंदोलकांचा प्रश्न नसून सह्याद्रीच्या अस्तित्वाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या पर्यावरणीय हक्कांचा प्रश्न असल्याचे उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी म्हटले आहे. भीमाशंकर येथे आमरण उपोषण करणाऱ्या सर्व आंदोलकांची शासनाने तातडीने दखल घ्यावी. गुरुग्राम, हरियाणा येथील ‘श्री सुब्रमण्यम पेसाला रीनु हायड्रो पॉवर’ कंपनीतर्फे होणारा पंप स्टोरेजचा सर्व्हे तात्काळ थांबवण्यात यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर शासनाच्या सक्षम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष चर्चा करून लेखी आश्वासन द्यावे. तसेच भविष्यात सह्याद्री व भीमाशंकर परिसरात पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्रकल्प स्थानिक जनतेचा विश्वास व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय राबवू नयेत, आदि मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

प्रशासकीय आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात व उपोषणामध्ये बाबाजी चासकर, अशोक काळे, ॲड. संजय बेंडे पाटील, अजय मुळूक, डॉ. निळोबा गायकवाड, बाळासाहेब रोडे, संतोष पवार, शांताराम जाधव आदींसह अनेक पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार

घोडेगावचे वनविभागाचे वन अधिकारी कुणाल लिमकर, मंडलाधिकारी सीताराम तुरे हे घटनास्थळी उपस्थित होते.

Vedh News