भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक ; NCRA) संस्थेतील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

पुणे- भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) संस्थेतील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक बबन हडवळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर Official Secrets Act आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या दक्षता विभागातील अधिकारी वैभव पांडुरंग शेरकर (३५) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
NCRA च्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील केंद्रात २४ मे २०२५ रोजी ‘वर्क असिस्टंट’ पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती जून २०२६ मध्ये दक्षता विभागाला मिळाली. त्यानंतर तक्रारदार शेरकर यांनी ३१ जुलै रोजी माहिती देणाऱ्या व्यक्तीची भेट घेतली.
तक्रारदार वैभव शेरकर यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीला परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजेच २३ मे रोजी सकाळी सुमारे सव्वा सात वाजता विवेक हडवळे याच्या मोबाईलवरून व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिका मिळाली होती. या व्यक्तीने प्रश्नपत्रिकेच्या छापील प्रती आणि व्हॉट्सॲप संदेशांचे स्क्रीनशॉट दक्षता विभागाकडे सादर केले. तसेच, मोबाईल स्क्रीनवरील प्रश्नपत्रिकेच्या नमुन्याचे फोटोही घेण्यात आले.
दक्षता विभागाने संबंधित व्यक्तीकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिकेची संस्थेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तुलना केली. या पडताळणीत दोन्ही प्रश्नपत्रिका एकसारख्या असल्याचे आढळले. त्यानंतर गोपनीय परीक्षा साहित्य उघड केल्याच्या आरोपाखाली हडवळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






