पत्नी आणि मेहुणीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ३० वर्षीय तरुणाने संपवले जीवन

पत्नी आणि मेहुणीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ३० वर्षीय तरुणाने संपवले जीवन 
Share

पुणे – किरकोळ कारणांवरून भांडण करून पत्नी आणि मेहुणीकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जनवाडी परिसरात उघडकीस आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात मृत तरुणाच्या पत्नीसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम अनिल जाधव (वय ३०, रा. पाच पांडव सोसायटी, जनवाडी जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमची आई लक्ष्मी अनिल जाधव (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नी रेवती प्रेम जाधव (वय २५) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय ३०, रा. धर्मनगर, जनवाडी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रेम हा बेरोजगार होता आणि त्याच्यावर काही प्रमाणात कर्जही होते. त्यातच पत्नी रेवती आणि मेहुणी रितिका या दोघी किरकोळ कारणांवरून प्रेमशी सतत भांडण करून त्याला तीव्र मानसिक त्रास देत होत्या. या सततच्या कौटुंबिक भांडणाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून प्रेमने ४ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल पाटील अधिक तपास करत आहेत.

Vedh News