ब्रेकिंग न्यूज

पुण्यात डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांत वाढ; पुणे महापालिकेच्या २,२३१ जणांना नोटिसा; चार लाखांचा दंड

Share

पुणे- हवामानातील वाढती आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांची पैदास रोखण्याबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या २,२३१ घरांना व संस्थांना पुणे महापालिकेकडुन नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कीटकजन्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे ४८५ संशयित रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या अवघ्या पहिल्या काही दिवसांतच ७६ संशयितांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने ऑगस्टमध्ये २१ जणांना डेंग्यूची आणि १४ जणांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत चिकनगुनियाचे केवळ ७ रुग्ण होते; मात्र एकट्या ऑगस्ट महिन्यात या संख्येत मोठी झाली आहे.

पुणे महापालिकेने ‘हॉटस्पॉट’ भागात धूरफवारणी आणि डास प्रतिबंधक मोहीम तीव्र केली आहे. ‘शहरात रुग्ण आढळताच त्याच्या घराभोवती तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत,’ अशी माहिती पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.