रहाटणी-काळेवाडीतील रस्त्यांची आरक्षणे तातडीने ताब्यात घ्या, मच्छिंद्र तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

रहाटणी-काळेवाडीतील रस्त्यांची आरक्षणे तातडीने ताब्यात घ्या, मच्छिंद्र तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Share

पिंपरी- रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांची तसेच सार्वजनिक सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रस्त्यांच्या आरक्षणाचा मोबदला घेऊनही काही नागरिकांनी आरक्षित जागांवर अतिक्रमण करून रस्ते अडविल्याचा आरोप तापकीर यांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काळेवाडीतून पिंपरीकडे जाण्यासाठी वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लक्की बेकरी ते पिंपरीगाव तसेच राजवाडेनगर ते पिंपरी पूल या मार्गांवरील रस्त्यांचा विकास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हे रस्ते विकसित झाल्यास पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प आणि काळेवाडीतील नागरिकांना एम्पायर इस्टेट पुलाकडे जाणे अधिक सोयीचे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच रहाटणी-काळेवाडी परिसरातील १२, ९ आणि ६ मीटर रुंदीचे आरक्षित रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घ्यावी. बाधित जमीनमालकांना जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाकड, रावेत, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागरप्रमाणे काळेवाडीचाही विकास व्हावा, यासाठी रस्त्यांची आरक्षणे आणि सार्वजनिक सुविधांसाठी राखीव जागा महापालिकेने तातडीने ताब्यात घेणे आवश्यक आहे. अन्यथा परिसराचा विकास खुंटून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागेल, अशी भूमिका तापकीर यांनी मांडली आहे.

Vedh News