शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे

पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. आज, मंगळवारी (दि. २४) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची साहित्य वर्तुळात चर्चा होती. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. येत्या २८ ते ३१ जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे ऐतिहासिक शंभरावे साहित्य संमेलन रंगणार आहे.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावात १ जून १९५६ रोजी शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म झाला. सामाजिक विषमता, जातिव्यवस्थेची उतरंड, अस्पृश्यता आणि वंचित समूहांच्या जगण्यातील संघर्ष यांचे वास्तव त्यांच्या बालपणापासूनच अनुभवास आले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवी, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर ‘मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य : एक तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. संपादन केली. भारतीय दलित साहित्य आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीय साहित्य यांच्यातील साम्य, संघर्ष आणि अभिव्यक्तीचे स्वरूप यांचा त्यांनी अभ्यास केला.
लिंबाळे यांची व्यावसायिक आणि साहित्यिक कारकीर्द
लिंबाळे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून झाली. त्यानंतर १९८६ ते १९९२ या काळात त्यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उद्घोषक म्हणून काम केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली. या विद्यापीठातून ते निवृत्त झाले. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’ या १९८४ मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवली.
लिंबाळे यांनी साहित्याच्या विविध प्रकारांत लेखन केले आहे. ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘सनातन’ आणि ‘रामराज्य’ या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. ‘दलित ब्राह्मण’, ‘देवता आदमी’ हे त्यांचे कथासंग्रह चर्चेत राहिले. ‘उद्रेक’, ‘ओ’ आणि ‘यलगार’ या कविता आणि काव्यलेखनातूनही त्यांनी सामाजिक वास्तवाला अभिव्यक्ती दिली.







