हिंजवडी शिवाजीनगर मार्गावरील आणखी दोन स्थानके आजपासून सुरु होणार !

हिंजवडी शिवाजीनगर मार्गावरील आणखी दोन स्थानके आजपासून सुरु होणार !
Share

पुणे- माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील (लाईन ३) बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके आज, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजल्यानंतर प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत. अशी माहिती मेट्रो प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी आता या मेट्रो मार्गावरील एकूण १९ स्थानके खुली झाली आहेत.

हिंजवडी- शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे उदघाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. दुसऱ्या दिवसापासून या मार्गावरील मेट्रो वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांची वाहतूक सुरू झाली होती. आता बालेवाडी फाटा आणि बालेवाडी हायस्ट्रीट या स्थानकांना रेल्वे सुरक्षा मंडळांची मंजुरी मिळाली आहे.

उर्वरित चार स्थानकेही अल्पावधीत सुरू होतील. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या मार्गाचा सध्या दररोज सुमारे ५० हजार प्रवासी वापर करीत आहेत. जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण संग्रहालय, श्री शिवछत्रपती शिवाजी चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांचा सध्या सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने दिली आहे.

Vedh News