ब्रेकिंग न्यूज

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैल काळाच्या पडद्याआड बैलगाडा मालकांकडून दुःख व्यक्त

Share

वडगाव मावळ- मावळ तालुक्यातील प्रथम ‘भारतकेसरी’ म्हणून ओळख असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे गुरुवारी (दि.२७) वारंगवाडी येथे निधन झाले. ओम्याच्या निधनाने मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शौकीन तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

मावळ तालुक्यातील भाजपाचे नेते आणि बैलगाडा मालक रामनाथ वारींगे यांचा ओम्या हा बैल होता. शेतकरी आपल्या बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ करतो. त्याचप्रमाणे वारींगे यांनीही ओम्याचा जिव्हाळ्याने सांभाळ केला. अनेक शर्यतींमध्ये आपल्या मालकाची मान उंचावणाऱ्या ओम्याच्या निधनाने बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली आहे.

ओम्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भावनिक श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. ओम्याचे शर्यतीतील जुने व्हिडिओ, फोटो आणि त्याच्या विजयांच्या आठवणी मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. ‘ओम्या तू परत ये’, ‘घाटाचा ढाण्या वाघ हरपला’, ‘बैलगाडा शर्यतीचा बादशहा काळाच्या पडद्याआड’ अशा भावनिक प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

बैलगाडा शर्यत क्षेत्रात ओम्याने आपल्या वेगाने आणि दमदार कामगिरीने महाराष्ट्रभर लौकिक मिळवला होता. बैलगाडा शर्यत म्हटली की ‘ओम्या’ची बारी अनेकांच्या आठवणीत आहे. घाटात ओम्याची धाव पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शौकीन गर्दी करत असत. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी गाड्यांवर मात करत अवघ्या एक-दोन सेकंदांच्या फरकाने आघाडी मिळवत ओम्या आपल्या मालकाची मान अभिमानाने उंचावत असे. त्याचा वेग, धावण्याची शैली आणि रुबाब यामुळे त्याची बारी लागली की घाटावर शौकिनांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे.