ब्रेकिंग न्यूज

फूड डिलिव्हरी बॉयवर कोयता आणि पट्ट्याने प्राणघातक हल्ला, महिला व्यवस्थापिकेला अटक

Share

पिंपरी- क्षुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयवर कोयता आणि पट्ट्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फूड डिलिव्हरी कंपनीच्या महिला व्यवस्थापक आणि तिच्या पतीसहित ४ साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेवाडी येथील पाचपीर चौकात घडली.

सुंदरम लालचंद यादव (वय २५, रा. राहाटणी) असे हल्ला झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. व्यवस्थापिका आशु, तिचा पती कांतीलाल (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) ओमकार, सोहम, निखिल आणि राज या आरोपींवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिपीओ लॉजिस्टिक’ फूड डिलिव्हरी कंपनीत काम करणाऱ्या सुंदरम लालचंद यादव (वय २५, रा. राहाटणी) यांचा आयडी बंद झाल्याने, त्यांचा महिला फिल्ड व्यवस्थापक आशु हिच्याशी फोनवर जोरदार वाद झाला होता. यानंतर आशुने सुंदरमला फोन करून झालेल्या वादाबाबत माफी मागण्यासाठी पाचपीर चौकात ये, असे सांगून बोलावून घेतले.

सुंदरम यादव ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आशु मॅडम, तिचा पती आणि इतर साथीदारांनी त्याला घेरले. काही समजण्याच्या आतच आरोपी ओमकार याने थेट धारदार कोयत्याने सुंदरमच्या डोक्यात, हातावर आणि कानावर सपासप वार केले. तर इतर आरोपींनी त्याला पट्ट्याने अमानुष मारहाण करत रक्ताच्या थारोळ्यात पाडले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुंदरम यादव यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीना अटक केली.