ब्रेकिंग न्यूज

पुणे पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल, काय आहे प्रकरण ?

Share

मुंबई- विविध सण, राजकीय कार्यक्रम आणि सणांनिमित्त काढणाऱ्या येणाऱ्या मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण कमी करण्यात कसूर केल्याचा दावा करून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २७) रोजी ही याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. सत्या मुळे यांनी दिली आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा सहकारी संस्था व अपार्टमेंट महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ, पुणे श्री स्वामी समर्थ सहकारी संस्था, आणि ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक विलास लेले यांचा या याचिकेत समावेश आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट २०२४ रोजी ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्देश दिले होते. मात्र पुणे पोलिसांकडून या निर्देशाचे पालन करण्यात कसूर झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

गणेशोत्सव, ईदसह विविध धार्मिक सण, राजकीय सभा, मिरवणुका तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि निवासी भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी नागरिकांकडून पोलिस हेल्पलाइनवर संपर्क साधला जात असतानाही अनेक प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. पोलिसांकडे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नाही.याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. सत्या मुळे यांनी धार्मिक सणांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करता येणार नाही, असा मुद्दा मांडला आहे. लाऊडस्पीकरचा वापर हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डीजे किंवा ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला धार्मिक स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण मिळू शकत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.