पुणे- सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने परदेशातून शुल्कमुक्त साखर आयात करण्यास परवानगी दिली असून, त्यामुळे साखर व गुळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरात घसरण झाली आहे.
ऊस उत्पादनात अपेक्षेपेक्षा झालेली मोठी घट आणि सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी यामुळे देशात साखरेचे दर वेगाने वाढत होते. किरकोळ बाजारात सरासरी भाव ६२ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपयांनी घसरण झाली. तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांनी घट झाली आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या काळात साखर आणि गुळाची मागणी वाढणार असतानाच दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
इथेनॉल निर्मितीमुळे दर वाढले होते का ?
इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिस (मळी) वापरला जातो. त्यामुळे साखर महागल्याची चर्चा असली तरी, सरकारच्या स्पष्टीकरणानुसार इथेनॉलसाठी उसाचा वापर १२ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर खाली आला आहे. त्यामुळे दरवाढीस थेट इथेनॉल कारणीभूत नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
