ब्रेकिंग न्यूज

पंढरपुरचा विठ्ठल अक्कलकोटमध्ये दिसला ; अभिनेते मिलिंद गवळी यांचा रंजक किस्सा

Share

वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचे दर्शन देणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांना पंढरपूरच्या विठुरायाने अक्कलकोटला वेगळ्या स्वरूपात दर्शन दिले. प्रत्यक्ष घडलेला किस्सा मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीमधून सांगितला आहे.

मिलिंग गवळी यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दात…

“माझ्या लेकीचं लग्न होतं. तेव्हा माझी बायको म्हणाली की, आपण कोल्हापूरला देवीच्या पायाशी मुलीच्या लग्नाची पत्रिका ठेवू. तिथून आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पायाशी पत्रिका ठेवू. मग तिथून अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी पत्रिका ठेवू. सर्व ठरल्यावर आम्ही कोल्हापूरला गेलो तिथे छान पत्रिका वगैरे ठेवली. त्या ठिकाणी आमच्या ओळखीचे पुजारी गृहस्थ होते त्यामुळे सगळं छान झालं. त्यानंतर आम्ही पंढरपूरला जायला निघालो. विठ्ठल विठ्ठल चित्रपट केला होता त्यामुळे एक उत्साह होता ”

“त्यादिवशी कार्तिकी एकादशी होती का काय जाणे पण त्यादिवशी तिथे प्रचंड गर्दी होती. शिवाय पंढरपूरला माझ्या ओळखीचही कोणीच नव्हतं. मी तरीही फक्त पत्रिका ठेवायची आहे असं सांगून प्रयत्न केला पण तेही शक्य झालं नाही. नंतर कोणीतरी मला सांगितले की मुखदर्शन घेता येईल. तुम्ही ती पत्रिका कोणाकडे तरी पुढे द्या मग ते ठेवतील. तिथे अगदी लांबून मला विठ्ठलाचं मुखदर्शन झालं. त्यावेळी मी मनात म्हटलं की पांडुरंग कधीतरी गाभाऱ्यात बसवतो आणि कधीतरी इतक्या लांब उभा करतो की जवळ सुद्धा येऊ देत नाही. त्याची ती काय महिमा आहे मला माहित नाही. मग बायकोला म्हटलं आपल्याला दर्शन काही मिळणार नाही त्यामुळे आपण कोणाला तरी सांगून पत्रिका तिथे ठेवायला सांगू. आपल्याला पुढे अक्कलकोटलाही जायचं आहे ”

” मग अक्कलकोटला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर एक मुलगा मला पाहून माझ्याकडे धावत आला. तो मला म्हणाला की अहो मिलिंद गवळी तुमच्यामुळे माझं घर झालं. त्याच्या बोलण्याचं मलाही आश्चर्य वाटलं की माझ्यामुळे याचा कस काय घर झालं! तेव्हा तो म्हणाला की अहो तुम्ही तो पिक्चर केलेला ना आई तुझा आशिर्वाद… तो लक्ष्मी वर आधारित होता आणि त्यात तुम्ही एक पूजा सांगितलेली. ती मी केली आणि माझं घर झालं. त्यानंतर तो मला म्हणाला की माझ्यासोबत चला मी तुम्हाला दर्शन करून देतो. मग अक्कलकोटलाही अगदी स्वामींच्या चरणी पत्रिका ठेवायला मिळाली तिथेही उत्तम दर्शन झालं. तो मुलगा म्हणाला की एक दीड किलोमीटरवर स्वामींच्या पादुका आहेत तिथेही जाऊन येऊया. ४ वाजून गेले होते तरीही त्याने त्या ट्रस्टीला सांगितलं की मिलिंद गवळी आले आहेत त्यामुळे त्यांना प्रसादाचे जेवण वाढा. सगळ्यांचे जेवण झालेले असतानाही आम्हाला छान प्रसादाचं जेवण मिळालं. त्याने खास आमच्यासाठी पाण्याची बाटली मागवली ”

जेवण झाल्यावर त्या मुलाने माझ्या हातात वीस रुपये दिले आणि म्हणाला हे ठेवा. तेव्हा मी त्याला म्हणालो की अरे उलट मी तुला पैसे दिले पाहिजेत तू एवढे सगळे आमच्यासाठी केलस. तेव्हा तो म्हणाला की नाही तुम्ही मला काही देऊ नका हे शगुनाचे पैसे म्हणून तुमच्याकडे ठेवा, तुमच्या पाकिटात किंवा कपाटात ठेवून द्या. मग आम्ही गाडीत बसायला गेलो तेव्हा मला आठवलं की आपण याचा नावच विचारलं नाही तेव्हा मी त्याला त्याचं नाव विचारलं. तो म्हणाला पांडुरंग ! हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे पंढरपूरला मी विठ्ठलाला म्हणालेलो की काय तुझी महिमा मला कळत नाही. कधीतरी गाभाऱ्यात जवळ बोलावतो तर कधी इतक्या लांबून दर्शन देतो. इथे अक्कलकोटला एक मुलगा दिवसभर मला दर्शन घेऊन देतोय, जेऊ खाऊ घालतोय, प्रसादाचं जेवण देतोय. त्या पांडुरंगाचा आजही माझ्याकडे फोन नंबर आहे. तो मला महिन्यातून एकदा फोन वगैरे करतो किंवा मी त्याला फोन करतो “