ब्रेकिंग न्यूज

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक

Share

मुंबई- देशभरातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवस पुकारलेला संप मागे घेतला आहे. रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोर ऑफ बँक युनियन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे बँकांचे व्यवहार करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली होती. बँक कर्मचाऱ्यांची आठवड्यातून ५ दिवस कामकाजाची प्रमुख मागणी होती. या मागणीवर सकारात्मक विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विविध पर्यायांवर चर्चा करून सर्व संबंधित घटकांना मान्य होईल, असा मार्ग शोधणार आहे. तसेच कामगिरीवर आधारित प्रोत्साहन (PLI) योजना आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, सलग पाच दिवस बँका बंद राहू नये, ग्राहकांना संपाचा फटका बसू नये यासाठी रविवारी देखील बँका सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मात्र संप मागे घेण्यात आल्यामुळे बँकांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू राहणार आहेत.