पुणे – विश्रांतवाडीमध्ये अकरा वर्षीय मुलीवर शेजारच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात उशीर केला तसेच या गुन्ह्यामध्ये सहभागी महिलेला अटक केली नाही, याच्या निषेधार्थ नागरिकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर नागरिकांनी अडीच तास रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की दिनांक २२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळविले की, त्यांच्याकडे एक महिला तिच्या १२ वर्षाच्या मुलीला घेऊन आली असून तिच्यावर दिनांक १२ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार झालेले आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपी जयसिंग भानुदास साठे (वय 52 वर्ष राहणार कामगारनगर विश्रांतवाडी पुणे) याचेविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पीडित मुलगी कुटुंबासह विश्रांतवाडी परिसरात राहते. तिच्या घरापासून काही अंतरावर आरोपी साठे याचे घर आहे. साठे हा पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. मुलीचे पालक अत्यंत गरीब आहेत. मुलगी मैत्रिणीशी खेळत असताना मैत्रिणीच्या आईने तिला आपल्या नातेवाईकाकडे पीठ आणण्यासाठी पाठवले होते. त्या वेळी घरात एकट्या असलेल्या आरोपीने मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार घरातील कोणालाही सांगितल्यास तिच्या वडिलांना खोटे सांगून मोठे भांडण लावून देण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने काही दिवसांनी आईला प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विश्रांतवाडी पोलिसांना समजला त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात उशीर का केला असा प्रश्न विचारत पीडित मुलीला पीठ आणण्यासाठी सांगून आरोपीच्या घरी पाठवणाऱ्या महिलेला अटक करण्याच्या मागणीसाठी ३०० नागरिकांचा जमाव विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर जमला होता. संतप्त नागरिकांनी अडीच तास बीआरटी मार्ग रोखून धरण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याबाबत परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त चुलमुला रजनीकांत यांनी नागरिकांशी संवाद साधून जमावास शांत केले व संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
