ब्रेकिंग न्यूज

पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ, ११ जणांना अटक

Share

पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरट्यांनी आणि मोबाईल चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांचे दागिने आणि महागडे मोबाईल लंपास करण्याच्या १४ घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये सोन्याच्या चेन, मंगळसूत्र आणि लॉकेटसह सुमारे नऊ लाख ७७ हजार ३१४ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्या. बेलबाग चौकात दोन स्वतंत्र घटनांमध्ये अनुक्रमे १४ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपये किमतीची आणि दहा ग्रॅम वजनाची सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली. याच परिसरातील आणखी एका घटनेत २० ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली.

गणपती चौक परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या एका भाविकाच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरीला गेली. केळकर रस्त्यावरील मोरेश्वर कॉर्नरजवळ नऊ ग्रॅम वजनाची सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली. त्याच परिसरातील दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले.

केळकर रस्त्यावरील कै. डॉ. गोविंद खरे चौक परिसरातही गर्दीचा फायदा घेत सहा ग्रॅम वजनाची सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली. सदाशिव पेठेतील रुपरंग साडी दुकानाजवळ आठ ग्रॅम वजनाची सुमारे २५ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरीला गेली. लक्ष्मी रस्त्यावरील चित्रशाळेजवळही गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यात आली. या घटनेत चोरट्याने दोन हजार रुपये आणि कागदपत्रे असलेले पाकीट चोरून नेले. बेलबाग चौक, गणपती चौक, केळकर रस्ता, मोरेश्वर कॉर्नर, कै. डॉ. गोविंद खरे चौक, सदाशिव पेठ, नगरकर तालीम चौक आदी परिसरांत चोरट्यांनी आपले हस्तलाघव दाखवले.

शिवाजी महाराज रस्त्यावरील बुधवार चौकातून दगडूशेठ गणपती मंदिराकडे जात असताना एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि लॉकेट असा सुमारे एक लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.