बारामती – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार येणार अशी चर्चा असताना अखेर पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख ठरली आहे. २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी आणि त्याबाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्य़क्ष शरद पवार यांनी काल (बुधवारी दि. २३) बारामतीतील नक्षत्र गार्डन येथील ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी केली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणियार, प्रताप पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे, विश्वस्त किरण गुजर, सचिव नीलिमा गुजर आदी उपस्थित होते.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेले ‘प्रेरणास्थळ’ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा तसेच महापुरुषांच्या चित्रांद्वारे कार्याचा आणि विचारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी मोदींना बोलावण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत.
