ब्रेकिंग न्यूज

हिंजवडीत अनोखे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्याला राखी बांधून केला प्रशासनाचा निषेध

Share

हिंजवडी- हिंजवडी आणि माण परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी हिंजवडी आणि माण परिसरातील महिलांनी रस्त्यांवरील खड्ड्यांना राखी बांधून अनोखे व उपरोधात्मक आंदोलन केले. ‘आता तूच आमचे रक्षण कर’ असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हिंजवडीच्या माजी उपसरपंच दीपाली जांभुळकर, माणच्या भूमिपुत्र यशराज पारखी आणि शिवाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे रक्षाबंधन आंदोलन करण्यात आले. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

अतिवृष्टी आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे हिंजवडी-माण आयटी परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते, वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहनचालक व नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हा मार्ग पत्करावा लागला असे स्थानिक महिलांनी सांगितले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागणी करण्यात आली; मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.