पुणे – मांजरी येथे मागील १७ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर पुण्याच्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते आंदोलकांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी बोलवत चर्चा केली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दोन अध्यादेश काढण्यात आले आहेत. हे दोन्ही अध्यादेश घेऊन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांना आंदोलकांची मनधरणी करण्यात यश आलं. आंदोलनकर्त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करुन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच जे निर्णय तातडीने घेण्यासारखे होते, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दुसरीकडे आपल्या मागण्यांची अंमलबजावणी पुढच्या तीन महिन्यात होताना दिसली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आदोलकांनी उपोषण सोडताना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांची मनधरणी करण्यात सरकारला मोठं यश आले आहे.
