पुण्यात २० नोव्हेंबरनंतर रस्ते खोदल्यास चारपट दंड; महापालिका आयुक्तांचा इशारा

पुण्यात २० नोव्हेंबरनंतर रस्ते खोदल्यास चारपट दंड; महापालिका आयुक्तांचा इशारा
Share

पुणे- पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुणे महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. स्पर्धेच्या मार्गावर विविध सुविधांसाठी सुरू असलेले खोदकाम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या मुदतीनंतर खोदकाम केल्यास सध्याच्या शुल्काच्या किमान चारपट दंड आकारण्यात येणार आहे.

गुरुवारी (दि. १२) महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त आढावा बैठक झाली. यामध्ये स्पर्धेच्या मार्गावरील पॅकेजमधील पायाभूत सुविधा आणि सुशोभीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. परवानगी मिळूनही विविध यंत्रणांकडून खोदकामाची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुदतीनंतर खोदकाम करणाऱ्या यंत्रणांवर प्रस्तावित धोरणानुसार सध्याच्या शुल्काच्या किमान चारपट दंड आकारला जाणार आहे. संबंधित संस्थांना किती काम पूर्ण करणार, किती कर्मचारी तैनात करणार आणि किती पथके कामावर असणार, याची लेखी माहितीही द्यावी लागणार आहे. रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती वेळेत व योग्य दर्जाने व्हावी यासाठी महापालिका आपल्या नियुक्त कंत्राटदारांमार्फत ही कामे करून घेण्याचाही विचार करत आहे.

एमएनजीएल (MNGL), महावितरण (MSEDCL), दिनेश इंजिनिअरिंग आणि अलाईड डिजिटल यांसारख्या सर्व संबंधित यंत्रणांना त्यांनी नेमलेले मनुष्यबळ, कार्यपथके आणि २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणाऱ्या कामाचे प्रमाण याबाबतचे लेखी हमीपत्र सादर करावे लागणार आहे. खोदाईमुळे खराब झालेले रस्ते आणि पदपथ तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील चारही विकास पॅकेजअंतर्गत सुरू असलेले डांबरीकरण, सायकल ट्रॅक आणि सुशोभीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.

 

Vedh News