पुणे – दुकानातील खरेदीसाठी दुचाकीवरून जाताना वाटेत एका व्यापाऱ्याची दोन लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि अडीच लाख रुपयांचा स्वाक्षरी केलेला धनादेश असलेली पिशवी पडली. कोंढवा बुद्रूक येवलेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून अवघ्या दोन दिवसांत हा ऐवज ताब्यात घेऊन संबंधित व्यापाऱ्याला परत दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी परिसरातील एका किराणा व्यावसायिकाचे ‘बालाजी ट्रेडर्स’ नावाचे दुकान आहे. ते बुधवारी (ता. १६) दुकानातील मालाच्या खरेदीसाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांनी दुचाकीच्या हँडलला दोन लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि अडीच लाखांचे दोन धनादेश असलेली पिशवी अडकवली होती. प्रवासादरम्यान ही पैशांची बॅग रस्त्यात कोठेतरी पडली. बॅग गहाळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोंढवा बुद्रूक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांनी तपास पथकाला मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकातील अंमलदारांनी व्यापाऱ्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दोन दिवस बारकाईने विश्लेषण केले. या तपासणीदरम्यान व्यापाऱ्याची पैशांची बॅग एका सोसायटीजवळ रस्त्याच्या बाजूला पडल्यानंतर पायी जाणाऱ्या एका व्यक्तीने ती उचलल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसले.
ती व्यक्ती बॅग घेऊन सोसायटीमध्ये गेल्याचे समोर आले. पोलिसांनी सोसायटीत जाऊन शोध घेतला असता संबंधित व्यक्ती आढळून आली. चौकशी केली असता रस्त्यावर बॅग सापडल्याने ती घरी आणल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ती रक्कम आणि धनादेश ताब्यात घेऊन मूळ व्यापाऱ्याच्या स्वाधीन केले. कष्टाची कमाई परत मिळाल्यामुळे व्यापाऱ्याने पोलिसांचे धन्यवाद मानले.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त रामदास इंगवले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश बेदुगडे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, लक्ष्मण होळकर, अनिल बनकर, किशोर पवार, मयूर मोरे, रूपेश पाटील, सुजित मदन आणि विजय खेंगरे यांच्या पथकाने केली.
