मुंबई- महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्यावरील भरमसाठ नफेखोरीवर चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालयांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यास केंद्रीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. एकूणच तुकाराम मुंढे यांच्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा खासगी रुग्णालयांकडून कसा घेतला जातो याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एक्स (X) वर केलेल्या एका पोस्टमध्ये मुंढे म्हणाले की, रुग्णालयाच्या बिलातील सर्वात महागडा भाग हा अनेकदा अशा वस्तूंचा असतो, ज्यांची किंमत रुग्णापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ठरलेली असते. खरेदी किंमत आणि छापील एमआरपी (MRP) यांच्यातील ही मोठी तफावत सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे, कारण उपचारादरम्यान रुग्णांना किमतींची तुलना करण्याची संधीच मिळत नाही असे मुंढे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती मुंढेंनी समोर आणली. त्यांच्या मते, ११.०५ रुपये खरेदी किंमत असलेल्या एका आयव्ही इन्फ्युजन सेटवर ३२५ रुपये एमआरपी छापलेली होती. हा नफा तब्बल २,८४१ टक्के इतका प्रचंड आहे. ६.७५ रुपयांना मिळणाऱ्या एका सिरिंजवर ५७.२० रुपये एमआरपी होती, तर २९.४१ रुपयांना खरेदी केलेल्या कॅथेटरवर ३१० रुपये एमआरपी छापलेली होती.
मुंढे यांनी स्पष्ट केलं की, या वस्तू खरेदी करणे रुग्णांसाठी ऐच्छिक नसते. रुग्णालयात दाखल झालेले लोक उपचारादरम्यान वेगवेगळ्या ब्रँड्सची तुलना करू शकत नाहीत किंवा किमतींवरून घासाघीस करू शकत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये उत्पादक आणि वितरकच एमआरपी ठरवतात आणि तिचा मूळ खरेदी किमतीशी काहीही संबंध नसतो. परिणामी अंतिम किंमत आणि रुग्णांना मिळणारी माहिती यावर कोणाचेही नियंत्रण राहत नाही, असे मुंढे म्हणाले.
यावर तीव्र आक्षेप घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी’ (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहून या प्रकारावर तातडीने नियमन आणण्याची आणि ‘ट्रेड मार्जिन’वर मर्यादा घालण्याची शिफारस केली आहे.
