पीडीसीसी बँकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित, काय आहे कारण ?

पुणे- राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाच्या निर्णयानुसार, राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी दुष्काळ निवारण व मदतकार्यात व्यस्त राहावेत, तसेच शेतकऱ्यांना निवडणुकीत सहभागी होण्यात अडचण येऊ नये, म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. संलग्न संस्थांच्या सभासदांकडून प्रतिनिधींच्या नावाने ठराव मागवण्यात आले होते. त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार करून हरकती मागवण्यात आल्या होत्या. विविध गटांकडून हरकती आणि आक्षेप दाखल झाले होते. त्यावर सुनावणी देखील सुरू होती. दरम्यान, मंगळवारी राज्य शासनाने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. निवडणूक कधी पुन्हा सुरू होईल याबाबत सहकार विभाग किंवा निवडणूक प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही नवीन तारीख जाहीर केलेली नाही.
मात्र सहकारी गृहनिर्माण संस्था, ज्या संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहेत, किंवा ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी सुरू झाली आहे. त्यांना या स्थगितीमधून वगळण्यात आले आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासनाचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, गौतम वर्धनयांनी दिली आहे.






