ब्रेकिंग न्यूज

परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या ५००० एसटी बस सामील होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Share

मुंबई- राज्यातील शहरापासून खेड्यापाड्यातील दुर्गम भागापर्यंत पोहोचलेली एसटी म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा आधार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्याला आता पाच हजार बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दर टाटा मोटर्ससारख्या नामांकित आणि विश्वासार्ह संस्थेने सादर केला आहे. त्यामुळे बसच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.

सरनाईक म्हणाले की, येत्या सहा महिन्यांत सुमारे पाच हजारांहून अधिक बस प्रवासी सेवेतून कालबाह्य होऊन भंगारात जाणार आहेत. दोन बाय दोन आसन व्यवस्थेच्या २,६४० ‘लालपरी’ बस ताफ्यात दाखल झाल्या. तीन बाय दोन आसन व्यवस्थेच्या तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बस ताफ्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता नव्या पाच हजार बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीला मोठी बळकटी मिळणार आहे. नव्या बसमुळे जुन्या बसवरील ताण कमी होईल, बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविणे शक्य होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देता येईल. जुन्या व गळक्या बस; तसेच प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या समस्येवरही नव्या ताफ्यामुळे प्रभावीपणे मात करता येईल असे ते म्हणाले.

पाच हजार नव्या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले. बसफेरीचा फायदा झाला नाही, तरी चालेल. मात्र, बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी ती फेरी तोट्यात चालणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.