ब्रेकिंग न्यूज

कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकीला कंटेनरची धडक,जुळ्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू, वडील जखमी

Share

पुणे – कात्रज कोंढवा रोडवर कपिलामृत डेअरी समोर यु टर्न घेत असताना एका दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या अपघातात एका १६ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर तिचे वडील आणि बहीण जखमी झाले.

प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक (वय १६) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. वडील ज्ञानेश्वर नाईक आणि वैष्णवी ज्ञानेश्वर नाईक जखमी झाले असून वैष्णवीच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम एच १२ ZM ३५७९ या दुचाकीवरून वडील ज्ञानेश्वर हे आपल्या दोन जुळ्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी जात होते. कपिलामृत डेअरी समोरून ते यु टर्न घेत असताना कात्रजकडून कोंढव्याकडे जाणारा एच आर ३८ डब्लू ६९७७ क्रमांकाचा कंटेनर समोर आला. दुचाकी थेट कंटेनरच्या समोरच्या चाकाखाली आली. या धडकेत वडील आणि एक मुलगी वैष्णवी नाईक किरकोळ जखमी झाली. तर दुसरी मुलगी प्रतिभा नाईक हिला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला. दोन्ही मुली राजस सोसायटीमधील रामभाऊ म्हाळगी शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहेत.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनर चालक आणि कंटेनर ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा

मागील अनेक वर्षांपासून कात्रज -कोंढवा रस्ता हा मृत्यूचा सापळा होत चालला असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.