ब्रेकिंग न्यूज

डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार पुत्रासह ७ जण निलंबित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारवाई

Share

ठाणे – पालघर येथील ‘रिलीफ’ या खासगी रुग्णालयात दहीहंडीतील जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्याच्या वादावरून डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेकडून सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली आहे.

पालघर शहरातील शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यालय परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकातील सदस्य थर लावतानाकाही जण जखमी झाले. जखमी झाल्यानंतर पाच जणांना उपचारासाठी जवळील रिलीफ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे १९ हजार ८६६ रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले. यावेळी डॉक्टरांनी सिटीस्कॅन का करण्यास सांगितला याबाबत विचारणा करत जाब विचारला. डोक्याला मार लागल्याने वैद्यकीय तपासणी कारणास्तव ते आवश्यक असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र यावेळी वाद निर्माण झाला आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावी करत दमदाटी केली आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान शहर प्रमुख राहुल घरात यांनी एका कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करत, रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि पक्षाच्या शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार पालघर जिल्ह्यातील 7 पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. यात पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत, उपतालुका प्रमुख मनीष संखे, युवा सेना जिल्हा प्रमुख साईराज पाटील, युवा सेना उप तालुका प्रमुख रोहित गावी, उप तालुका प्रमुख राहुल संखे, युवा सेना विधान सभा प्रमुख ऋषभ वारे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.