पिंपरी -लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीने १७ वर्षीय मुलाला एका कॅफेमध्ये नेऊन त्याचा किस घेतल्याच्या कारणावरून मुलाच्या वडिलांनी थेट तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी तरुणीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या अंतर्गत ( पॉक्सो ) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात तीन सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या ४७ वर्षीय वडिलांनी पाच सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगा आणि आरोपी तरुणी हे एकमेकांचे लांबचे नातेवाईक आहेत. त्यांची आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन सप्टेंबर रोजी संबंधित तरुणीने मुलाला एका कॅफेमध्ये नेऊन त्याचा किस घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणीने थेट मुलाच्या घरी जाऊन लग्नाचा तगादा लावला.
‘माझा मुलगा अल्पवयीन असूनही शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूने तरुणीने मुलाला किस केला,’ अशी तक्रार वडिलांनी केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.
