चिंचवड-महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली असून बिघाड झालेला भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चिंचवड येथील महापारेषणच्या मुख्य उपकेंद्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे वीज यंत्रणेत प्रचंड तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पुढील मोठा धोका किंवा इतर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य वीजवाहिन्यांचा पुरवठा तातडीने बंद केला आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंत्रणेतील बिघाड मोठा असल्याने काम पूर्ण होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा नक्की कधी पूर्ववत होईल, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वेळ किंवा माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
महापारेषणकडून बिघाड झालेला भाग वगळून उपकेंद्रातील इतर भाग सुरक्षित करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर महावितरणकडून पर्यायी वीजवाहिन्यांद्वारे शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
