ब्रेकिंग न्यूज

पुण्यात डी जे विरोधात नागरिकांचा बालगंधर्व चौक ते पुणे महापालिका मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

Share

पुणे- कर्णकर्कश डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरले. आज, रविवारी झाशीच्या राणी चौकातून पुणे महानगरपालिकेपर्यंत नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. ‘डीजे बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत नागरिकांनी ध्वनीप्रदूषणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

डीजे विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ आणि डिजेच्या वाढत्या ध्वनिप्रदूषणावर त्रासलेल्या पुणेकरांनी आज आंदोलनाचा हत्यार उपसले. या मोर्चात विविध भागातील पुणेकर एकवटल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही धर्माचा सण, उत्सवात डीजे नको अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, निवृत्त पोलीस अधिकारी, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सणांना विरोध नाही, तर डीजेला विरोध राहील अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली. पारंपरिक ढोल ताशा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर समाजोपयोगी उपक्रमातून उत्सव साजरा करता येतो. मात्र डीजेच्या आवाजामुळे उत्सवाला गालबोट लागते. मुक्या प्राण्यांना देखील याचा खूप त्रास होतो याचा विचार कुणीच करत नाही त्यामुळे कोणत्याही सण, उत्सवात डीजे वाजवला नाही पाहिजे असे नागरिकांनी सांगितले.

कार्यक्रम झाल्यानंतर नोटिसा बजावणे, ध्वनीयंत्रणा जप्त करणे किंवा काही दिवसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करावी, नियोजित कार्यक्रमाच्या काही तास आधी पोलीस, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकांनी कार्यक्रमस्थळ, ध्वनीयंत्रणा उभारण्याची ठिकाणे आणि मिरवणुकीच्या प्रारंभस्थळाची तपासणी करावी. नियमबाह्य साऊंड सिस्टीम, स्पीकर वॉल अथवा जनरेटर आढळल्यास गर्दी जमण्यापूर्वीच ते थांबवून जप्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना देण्यात आले.